- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात चारा उत्पादन वाढविण्यासाठी सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकरी व पशुपालकांना शंभर टक्के अनुदानावर चारा बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार आहे.यासाठी इच्छुकांनी ३१ ऑक्टोंबर २०२६ पर्यंत अर्ज सादर करावेत,असे आवाहन जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय कार्यालयाने केले आहे.
जिल्ह्यात सध्या उपलब्ध असलेला चारा सुमारे तीन महिने पुरेल इतकाच असल्याने चारा उत्पादन वाढविणे, बियाणे वितरण आणि चाऱ्याचे योग्य व्यवस्थापन यावर प्रशासनाने भर दिला आहे.जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या मार्गदर्शनाखाली पशुसंवर्धन विभाग व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने याबाबत नियोजन करण्यात येत आहे.हिरव्या चाऱ्याचे उत्पादन वाढविण्यासोबतच मुरघास निर्मितीलाही प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
चारा उत्पादन व पशुधनाच्या पोषणाबाबत जनजागृती करण्यासाठी प्रत्येक पशुवैद्यकीय दवाखान्याच्या कार्यक्षेत्रात शेतकरी मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत.या मेळाव्यांत सुका व हिरवा चारा योग्य पद्धतीने साठविणे,मुरघास तयार करणे,चाऱ्याची पौष्टिकता टिकवून ठेवणे तसेच जनावरांना आवश्यक खनिजद्रव्ये व पूरक पोषण योग्य प्रमाणात देणे याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
इच्छुक पशुपालकांनी संबंधित पंचायत समितीतील तालुका पशुसंवर्धन अधिकारी किंवा जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय कार्यालय गडचिरोली येथे मुदतीत अर्ज सादर करावेत.अर्जाचा नमुना पंचायत समिती स्तरावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.
- Advertisement -

