- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-जिल्ह्याच्या आरमोरी विधानसभा मतदारसंघातील कोरची तालुक्यात मोठ्या प्रमाणात घेतल्या जाणाऱ्या सीताफळ व जांभूळ या फळपिकांच्या उत्पादनाला चालना देण्यासाठी तालुक्यात अद्ययावत रोपवाटिका,शेतकरी प्रशिक्षण केंद्र,फळ प्रक्रिया केंद्र तसेच आधुनिक शीतगृह उभारण्यात यावे,अशी मागणी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी ५ ऑक्टोंबर २०२६ रोजी राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कोरची तालुक्यातील शेतकरी तसेच आदिवासी बांधवांकडून मोठ्या प्रमाणावर सीताफळ व जांभूळ यांचे उत्पादन घेतले जाते.या फळपिकांच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर रोजगार व उत्पन्नाचे साधन निर्माण होण्याची मोठी क्षमता आहे.मात्र दर्जेदार रोपांची उपलब्धता,आधुनिक लागवड तंत्रज्ञान,पीक व्यवस्थापन, प्रक्रिया व साठवणुकीच्या सुविधा मर्यादित असल्यामुळे उत्पादकांना अपेक्षित आर्थिक लाभ मिळत नसल्याचे आमदार मसराम यांनी कृषी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.या पार्श्वभूमीवर कोरची तालुक्यात सीताफळ व जांभूळ यांची अद्ययावत रोपवाटिका सुरू करण्यासोबतच शेतकरी व आदिवासी उत्पादकांना आधुनिक लागवड तंत्रज्ञान,उत्पादन व्यवस्थापन व पीक संवर्धनाबाबत मार्गदर्शन मिळावे यासाठी प्रशिक्षण केंद्र उभारण्याची मागणी करण्यात आली आहे.तसेच उत्पादित फळांपासून विविध मूल्यवर्धित उत्पादने तयार करण्यासाठी फळ प्रक्रिया केंद्र आणि फळांची नासाडी टाळण्यासाठी आधुनिक शीतगृह व साठवणूक केंद्र उभारण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.याशिवाय स्थानिक शेतकरी उत्पादक गटांना प्रक्रिया,पॅकेजिंग,ब्रँडिंग व बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन व सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.या सुविधांमुळे फळपिकांचे मूल्यवर्धन होऊन उत्पादकांना त्यांच्या मालाला योग्य बाजारभाव मिळण्यास मदत होईल.त्याचबरोबर स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती होऊन शेतकरी व आदिवासी कुटुंबांच्या उत्पन्नात वाढ करण्यास हातभार लागेल.
कोरची तालुक्यातील उपलब्ध कृषी क्षमता आणि स्थानिक उत्पादकांचा विचार करून या प्रकल्पास प्राधान्याने मान्यता देण्यात यावी.यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून प्रशासकीय मान्यता देत रोपवाटिका, प्रशिक्षण व प्रक्रिया केंद्र तसेच शीतगृह उभारणीसाठी तातडीने कार्यवाही करावी,अशी मागणी आमदार रामदास मसराम यांनी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे केली आहे.
- Advertisement -

