- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-जिल्ह्याच्या वृत्तपत्रांमध्ये आज,रविवार ३ ऑगस्ट रोजी ‘जखमीला खाटेवरून नेले रुग्णालयात’ आणि ‘घनदाट जंगल खाटेची कावड अन् तीन किलोमीटर पायपीट’ या मथळ्यांखाली प्रकाशित झालेल्या बातम्यांवर गडचिरोली जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने स्पष्टीकरण दिले आहे.या स्पष्टीकरणानुसार,ट्रॅक्टर अपघातात जखमी झालेल्या रुग्णाला शेतातून मुख्य रस्त्यापर्यंत कावड करून व पुढे आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक वाहनाने रुग्णालयात पोहोचवण्यात आले,असल्याचा खुलासा जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी केला आहे.आरोग्य विभागाच्या माहितीनुसार,एटापल्ली तालुक्यातील जारावंडी प्राथमिक आरोग्य पथकात डॉ.प्रशिल घोनमोडे आणि डॉ.ज्योती रॉय हे वैद्यकीय अधिकारी तसेच इतर कर्मचारी मुख्यालयी राहून सेवा देतात.
शनिवार २ ऑगस्ट रोजी सकाळी ९.२० च्या सुमारास जारावंडी गावात तरस या जंगली प्राण्याने हल्ला केला होता.या हल्ल्यात चार ग्रामस्थ जखमी झाले होते. दुपारी १२.२० पर्यंत त्यांच्यावर उपचार सुरू होते. जखमा गंभीर असल्याने,या चारही जखमींना पुढील उपचारासाठी कसनसूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेद्वारे आणि जारावंडी पोलीस स्टेशनच्या चारचाकी वाहनाने गडचिरोली येथील जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले.त्याच दिवशी दुपारी १२.४० वाजता पेंदूरवाही गावात ट्रॅक्टर उलटल्याची माहिती रुग्णवाहिकेचे चालक राजन यांना फोनद्वारे मिळाली.परंतु,त्याच वेळी रुग्णवाहिका तरसच्या हल्ल्यातील जखमींना घेऊन गडचिरोलीला गेली होती.कोणत्याही क्षणाचा विलंब न करता,गावाकऱ्यांनी अपघातस्थळावरून जखमीला खाटेची कावड करून रस्त्यापर्यंत आणले.त्यानंतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी तात्काळ आपल्या वैयक्तिक वाहनाने जाऊन अपघातग्रस्त मनिराम हिचामी वय ३५ वर्षे,रा.पेंदूरवाही यांना दुपारी एक वाजताच्या सुमारास जारावंडी प्राथमिक आरोग्य पथकात आणले.डॉ.प्रशिल घोनमोडे यांनी जखमीवर तातडीने प्राथमिक उपचार केले.रुग्ण पूर्णपणे शुद्धीवर आणि स्थिर होता,मात्र ट्रॅक्टरवरून पडल्याने त्यांच्या कमरेचे हाड मोडले होते.गडचिरोलीला गेलेली रुग्णवाहिका परत येण्यास उशीर होणार असल्याने, प्राथमिक उपचारानंतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी पुन्हा आपल्या वैयक्तिक गाडीने त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले,असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रताप शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.
- Advertisement -

