उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- पेशी तारखेवर आरमोरी येथील न्यायालयात हजर करताना हिसका मारून पळून जाणाऱ्या आरोपीस जिल्हा व सत्र न्यायाधीश विकास एस.कुलकर्णी यांनी काल,गुरुवारी दि.२७ जून रोजी सात वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे.अजय अरुण हजारे वय ३२ वर्षे रा.डोंगरी ता.आरमोरी असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे की,५ मार्च २०२९ रोजी पोलिस हवलदार भाऊचंद गेडाम,पोलिस शिपाई नितेश चांदेकर व चालक रमेश बेसरा हे आरोपी अरुण हजारे हा चंद्रपूर कारागृहात बंदिस्त असल्याने त्याला आरमोरी येथील न्यायालयात पेशी तारखेवर हजर करण्याकरीता एमएच ३३ सी १४४ क्रमांकाच्या वाहनाने आणले होते.आरोपीस चंद्रपूर येथील कारागृहातून ताब्यात घेऊन हातकडीसह आरमोरी येथील न्यायालयात दुपारी १ वाजता पोहोचले.काही वेळाने न्यायालयात मध्यान्हाची सुटी झाल्याने आरोपीस पेशी करण्यास वेळ असल्याने त्याला प्रतीक्षालयात थांबवून ठेवण्यात आले.दरम्यान,२:४० वाजताच्या सुमारास आरोपी अजय हजारे हा न्यायालयातून हातकील-हातकडीसह हिसका मारून पळून जाऊ लागला.सोबत असलेले कर्मचारी नीतेश चांदेकर यांनी सदर आरोपीस पकडण्याचा प्रयत्न केला असताना,त्याने न्यायालयाच्या तळ मजल्यावरील भिंतीच्या लोखंडी रॉडला हिसा देऊन तोडले.वाहन चालक पिरमोहम्मद शेख तसेच न्यायालयातील कोर्ट मेहरर पोलिस शिपाई नागरगोजे व मंगेश डोनाडकर यांनी आरोपीला
न्यायालयाच्या संरक्षण भिंतीवरून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पकडले.त्यानंतर न्यायालयात दुपारी ३:५ वाजता त्याला हजर करण्यात आले. फिर्यादीच्या तक्रारीवरून आरमोरी पोलीस स्टेशन येथे आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.आरोपीविरुद्ध भरपूर पुरावे आढळून आल्याने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विकास एस. कुलकर्णी यांनी पुरावे व सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून काल,गुरुवारी आरोपी अजय हजारे यास कलम २२४ भादंवि अन्वये दोषी ठरवून दोन वर्ष कारावास व कलम ३३२ भादंविमध्ये ३ वर्ष तसेच कलम ४२७ भादंविमध्ये २ वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली.सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकिल एस.यु.कुंभारे यांनी कामकाज पाहिले.

