उद्रेक न्युज वृत्त
मुख्य संपादक/सत्यवान रामटेके
गडचिरोली :- शासकीय कार्यालय सलग दहा दिवस बंद असले; तर अनेकांना मोठा फटका बसतो.त्यांची कामे वेळेवर पूर्ण होत नाहीत.आधीच सरकारी काम सहा महिने थांब; अशी परिस्थिती असल्याने त्यामध्ये गोरगरीब नागरिकांच्या कामांना उशीर होतो.त्यामुळे अनेकांची कामे आता सोमवारी म्हणजेच आज तरी होणार काय?असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.अशातच आजही अनेक अधिकारी, कर्मचारी आपल्या कार्यालयात उपस्थित नसल्याने शासनाने सुट्ट्यांचे नियोजन करण्याची गरज आहे.अन्यथा सरकारी कर्मचारी ‘आम भरो पोट भरो..! सर्वसामान्य नागरिक कामासाठी हेलपाट्या मारून मरो…! अशी अवस्था झाल्याशिवाय राहणार नाही.
दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या असल्या तरीही अधिकारी व कर्मचारी मात्र अजूनही दिवाळी सुट्टी साजरी करण्यात मग्न आहेत.शासकीय कर्मचाऱ्यांना शनिवार,११ नोव्हेंबर ते बुधवार १५ नोव्हेंबरपर्यंत सलग पाच दिवस शासकीय सुट्टया होत्या; तसेच आठवड्यात गुरुवार,शुक्रवार दोनच दिवस कार्यालये सुरू होती.परिणामी काही नागरिकांची आवश्यक कामे अडकून पडली.त्यामुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्टया कमी करण्यात याव्यात; असा सूर सध्या जनतेमधून उमटत आहे.शनिवार व रविवारची सुट्टी आल्याने काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गुरुवार व शुक्रवार या दोन दिवसांची वैयक्तिक सुट्टी घेतली.यामुळे जनतेची मोठी गैरसोय झाली आहे.शनिवार,रविवार नियमित व शासनाच्या तीन सुट्टया मिळून शासकीय कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त सलग पाच दिवसांच्या सुट्ट्यांचा आनंद उपभोगता आला.त्यातही जिल्ह्यातील इतर तालुक्यांत कार्यरत अधिकारी,कर्मचाऱ्यांनी पुन्हा गुरुवार,शुक्रवारची वैयक्तिक सुट्टी घेतल्याने त्यांना शनिवार,रविवार मिळून सलग १० दिवसांच्या सुट्टया मिळाल्या आहेत.मात्र यात सामान्य नागरिकांची मोठी फजिती झाली आहे.तहसील कार्यालय,भूमी अभिलेख कार्यालय,पंचायत समिती,कृषी कार्यालय, परिवहन कार्यालय, नगरपंचायत, ग्रामपंचायत,नगरपालिका,आदी कार्यालयांशी ग्रामीण नागरिकांचा व शहरी नागरिकांचा थेट संपर्क येतो.सण संपला असूनही अनेक कार्यालयांमध्ये आजच्या स्थितीत शूकशुकाट दिसून येतोच आहे. शासकीय कार्यालयातील अधिकारी,कर्मचाऱ्यांना सर्वसामान्य नागरिकांच्या कामांशी कसलेही देणे-घेणे नसल्याचे दिसून येत असल्याने सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या कमी कऱ्याव्यात; असा बोलबाला सर्वत्र सुरू आहे.

