उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- गोंडवाना विद्यापीठाच्या मुख्य बँक खात्यातून १.४६ कोटी रुपये हडप केल्याची तक्रार विद्यापीठ प्रशासनाने करताच,गडचिरोली पोलिसांनी विद्यापीठातीलच चार लिपिकांना बुधवारी ५ जून रोजी अटक केली.चारही लिपिकांना न्यायालयात हजर केले असता,न्यायालयाने त्यांना १० जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.दरम्यान काल, गुरुवारी गोंडवाना विद्यापीठ प्रशासनाने संबंधित चार लिपिकांना निलंबित केल्याची माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे यांनी दिली आहे.आरोपी लिपिकांमध्ये महेशकुमार उसेंडी,अमोल रंगारी,अमित जांभुळे आणि प्रिया पगडे या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.मंगळवारी ४ जून रोजी विद्यापीठाचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी पठारे यांनी गडचिरोली पोलिस ठाण्यात विद्यापीठाच्या मुख्य बँक खात्यातून १.४६ कोटी रुपये हडप केल्याची तक्रार गडचिरोली पोलिस ठाण्यात दाखल केली होती.

