उद्रेक न्युज वृत्त
नाशिक :- प्रहार संघटनेचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री बच्चू कडू यांच्या अडचणी वाढल्या असून बच्चू कडू यांना दोन वर्षाचा कारावास ठोठावण्यात आला आहे.नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.त्यामुळे बच्चू कडू तुरुंगात जाणार की उच्च न्यायालयात दाद मागणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.मात्र,कोर्टाच्या निकालामुळे बच्चू कडू यांची डोकेदुखी वाढली असून बच्चू कडू समर्थकांमध्येही घबराट पसरली आहे.
२०१७ च्या एका प्रकरणात बच्चू कडू यांना ही शिक्षा ठोठावण्यात आली आहे.२०१७ मध्ये बच्चू कडू यांनी दिव्यांगांच्या मागण्यांसाठी आंदोलन केले होते. महापालिकेत हे आंदोलन करण्यात आले होते. आंदोलनावेळी बच्चू कडू यांनी तत्कालीन महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्यावर हात उगारला होता. त्यामुळे बच्चू कडू यांच्याविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सरकारी कामात अडथळा आणल्याचा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला होता.त्यानंतर हे प्रकरण कोर्टात गेले.नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर बच्चू कडू यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी एक, तर सरकारी अधिकाऱ्याला अपमानित केल्याप्रकरणी एक अशी २ वर्षांची शिक्षा बच्चू कडू यांना ठोठावण्यात आली आहे.