उद्रेक न्युज वृत्त
परभणी : पोलीस मुख्यालयातील क्वार्टरमध्येच निलंबित पोलीस शिपायाचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना परभणीमध्ये घडली आहे.पोलिसांच्या क्वार्टरमध्ये जर खून होत असले तर सर्वसामान्य नागरिक सुरक्षित आहेत का,असा प्रश्न या घटनेनंतर उपस्थित केला जात आहे.गजानन शिवाजी पाटील (वय ३६, वर्ष) असे खून झालेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे.या घटनेमुळे पोलीस दलामध्ये खळबळ उडाली असून घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,परभणी पोलीस दलामध्ये कार्यरत असलेल्या गजानन शिवाजी पाटील या पोलीस शिपायाचे निलंबन करण्यात आले होते. त्यामुळे त्यांची नेमणूक पोलीस मुख्यालय या ठिकाणी करण्यात आली होती.ते २५ जानेवारी रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास परभणी येथील पोलीस मुख्यालयातील कॉर्टरमध्ये असताना त्यांच्या डोक्यामध्ये आणि छातीवर मारून अज्ञात व्यक्तीने त्यांचा खून केला.हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मृत गजानन पाटील यांचा मृतदेह परभणी जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला.
शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर याप्रकरणी दुसऱ्या दिवशी पोलीस कर्मचारी तुळशीदास देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरोधात नानलपेठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेमुळे परभणी पोलीस दलामध्ये एकच खळबळ उडाली आहे.तर पोलीस मुख्यालयामध्येच पोलीस कर्मचाऱ्याचा खून झाला असल्याने सर्वसामान्य नागरिक सुरक्षित आहेत का?असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.