उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- जिल्ह्यातील शहरासह तालुका व ग्रामीण भागातील पेट्रोल पंपांवर अनेक सुविधांचा अभाव असून पेट्रोल व डिझेल खरेदी करणाऱ्या ग्राहकांचा अधिकार हिरावून घेतला जात असल्याने यांस जबाबदार कोण?असा प्रश्न निर्माण झाला आहे.पेट्रोल पंपावर पिण्याचे पाणी,स्वच्छतागृह,आग प्रतिबंधक उपकरणे,वाहनांमध्ये हवा भरण्याची ग्राहकांसाठी सुविधा असणे अनिवार्य आहे.सदर सुविधा पेट्रोल पंपांवर न ठेवल्यास संबंधित पेट्रोल पंप धारकांवर कारवाई करण्यात येते.
पेट्रोल व डिझेल खरेदी करणाऱ्या ग्राहकांचा हक्क हिरावून घेतला जाऊ शकत नाही.मात्र हल्ली कित्तेक पेट्रोल पंपांवर पिण्याचे पाणी असते तर स्वच्छतागृह नाही,आग प्रतिबंधक उपकरणे असतात तर वाहनांमध्ये हवा भरण्याची मशिनच गायब असते. अशी कित्तेक पेट्रोल पंपांवर बिकट अवस्था हल्ली निर्माण झाली आहे.
पेट्रोल पंपावर गैरसोय असेल तर त्या पेट्रोल पंपाची तपासणी करण्याचे अधिकार तहसीलदार तसेच पोलिसांना असते; परंतु तपासणीच होत नाही आणि तपासणी होत असेल तर त्यात त्रुट्या दिसत नाही.पेट्रोल पंपाची तपासणी करण्याचे काम पोलिस अधीक्षक कार्यालयातील जिल्हा विशेष शाखा व तहसीलदारांकडे असते; परंतु हे दोन्ही घटक या पेट्रोल पंपांकडे सपशेल दुर्लक्ष करीत असल्याने जिल्ह्यात वाहन चालकांना लुटण्याचे प्रकार सुरू आहे.
तपासणी अधिकाऱ्यांना त्रुटी न दिसणे म्हणजे ‘डोळ्यात तिखट’ घालण्यासारखी अवस्था झाली की काय?असा सवाल उपस्थित केला जातो आहे.तहसीलदारांच्या चौकशी अहवालावरून संबंधित पेट्रोल पंपावर कारवाई करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असतात.मात्र जिल्ह्यात सर्वत्र वेगळीच परिस्थिती पहावयास मिळते आहे.