उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- सह दुय्यम निबंधक वर्ग-२, हवेली क्र.२४ या कार्यालयाला दि.१२ ऑक्टोबर,२०२३ रोजी सह जिल्हा निबंधक वर्ग-१ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी (पुणे शहर) यांनी नोंदणी उपमहानिरीक्षक व मुद्रांक उपनियंत्रक,पुणे विभाग यांच्या समवेत अचानक भेट दिली होती.तसेच,सह जिल्हा निबंधक वर्ग-१ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी (पुणे शहर) यांच्या कार्यालयातील तपासणी पथकामार्फत सह दुय्यम निबंधक (वर्ग-२), हवेली क्र.२४ या कार्यालयामध्ये नियमित कार्यरत असलेले सह दुय्यम निबंधक (वर्ग-२) संगर्वातील श्री.एस.पी.भातंबरेकर,यांनी माहे सप्टेंबर २०२३ व ऑक्टोबर २०२३ (दिनांक ११ ऑक्टोबर, २०२३ पर्यंत) नोंदविलेल्या दस्तांची स्वैरपध्दतीने तपासणी सुरु करण्यात आली.
तपासणी दरम्यान सह दुय्यम निबंधक वर्ग-२, हवेली क्र.२४ या कार्यालयामध्ये नियमित कार्यरत असलेले सह दुय्यम निबंधक वर्ग-२ संगर्वातील श्री.एस.पी. भातंबरेकर यांनी दि.११ सप्टेंबर, २०२३ रोजी नोंदविलेल्या दस्त क्र.२०३७०/२०२३ या खरेदीखताच्या दस्तामध्ये रु.२४,९०,१५,८००/- इतक्या मुद्रांक शुल्काची कमी आकारणी केली असल्याची बाब उक्त तपासणी पथकाला प्रथमदर्शनी निदर्शनास आली असल्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक,महाराष्ट्र राज्य,पुणे यांनी त्यांच्या संदर्भाधिन दि.१७ ऑक्टोबर,२०२३ अन्वये शासनास कळविले.
श्री.एस.पी.भातंबरेकर, सह दुय्यम निबंधक (वर्ग-२), हवेली क्र.२४ यांनी नमुद दस्त क्र. २०३७०/२०२३ या खरेदीखताच्या दस्तामध्ये यथोचित मुद्रांक शुल्काची आकारणी न करुन शासनाच्या रु.२४,९०,१५,८००/- (अक्षरी रुपये चोवीस कोटी नव्वद लाख पंधरा हजार आठशे) इतक्या मोठया प्रमाणात मुद्रांक शुल्करुपी महसूलाची हानी केली असल्याची बाब प्रथमदर्शनी निदर्शनास आली असल्याने श्री.एस.पी.भातंबरेकर यांच्या विरुध्द महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ च्या तरतूदीनुसार शिस्तभंगविषयक कार्यवाही करण्यात आली आहे.
श्री.एस.पी.भातंबरेकर, सह दुय्यम निबंधक (वर्ग-२), हवेली क्र.२४ (सध्या कार्यरत सह जिल्हा निबंधक (वर्ग-१) तथा मुद्रांक जिल्हाधिकारी,पुणे शहर यांचे कार्यालय) हे महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ च्या नियम ४ च्या पोट-नियम (१) च्या खंड (अ) च्या तरतूदीनुसार दि.१९ ऑक्टोबर,२०२३ (म.नं.) पासून आणि ते पुढील आदेश काढले जाईपर्यंत निलंबित राहणार आहेत.
सदर आदेश अंमलात असेल तेवढया कालावधीत श्री.एस.पी.भातंबरेकर,सह दुय्यम निबंधक (वर्ग-२) यांचे मुख्यालय हे सह जिल्हा निबंधक (वर्ग- १) तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, गडचिरोली,जि.गडचिरोली येथे राहील आणि श्री.एस.पी. भातंबरेकर,सह दुय्यम निबंधक (वर्ग-२) यांना शासनाच्या पूर्व परवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही.
निलंबन आदेश अस्तित्वात राहतील त्या कालावधीसाठी श्री.एस.पी.भातंबरेकर,सह दुय्यम निबंधक (वर्ग-२) यांना,महाराष्ट्र नागरी सेवा (पदग्रहण अवधी,स्वीयेत्तर सेवा आणि निलंबन,बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे यांच्या काळातील प्रदाने) नियम,१९८१ च्या नियम ६८ व नियम ६९ अन्वये निर्वाहभत्ता व त्यावरील इतर भत्ते सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी,गडचिरोली, जि. गडचिरोली यांच्या कार्यालयामार्फत देय राहतील.
निलंबन कालावधीत श्री.एस.पी.भातंबरेकर,सह दुय्यम निबंधक (वर्ग-२) यांना महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ च्या नियम १६ मधील तरतूदीनुसार,कोणतीही खाजगी नोकरी स्वीकारता येणार नाही अथवा कोणताही व्यवसाय करता येणार नाही.जर,श्री.एस.पी.भातंबरेकर,सह दुय्यम निबंधक (वर्ग-२) यांनी खाजगी नोकरी स्वीकारली अथवा काही व्यवसाय केला तर,गैरवर्तणूकीबाबत त्यांना दोषी समजण्यात येऊन,त्याप्रमाणे त्यांचेविरुध्द कारवाई करण्यास ते पात्र होतील आणि अशा परिस्थितीत ते निर्वाहभत्ता मिळण्याचा हक्क गमावणार आहेत.