- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-सध्या स्थितीत राज्यात थंडीचा तडाखा वाढू लागला आहे.ग्रामीण भागात रात्रीच्या सुमारास शेकोट्या पेटू लागल्या आहेत.अशातच हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार बंगालच्या उपसागरात अचानक तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे चक्रीवादळासारखी स्थिती तयार होऊन हिमालयात २९ नोव्हेंबर पासून पश्चिमी चक्रावात सक्रिय होत आहे.अशा परस्परविरोधी वातावरणामुळे विचित्र हवामान तयार होत असल्याने बोचरी थंडी अन् बाष्पयुक्त वारे राज्यात वाहणार आहे.त्यामुळे डिसेंबरची सुरुवात कडाक्याच्या थंडीने होईल,असा नवा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
हवामान विभागाने डिसेंबरमध्ये कमी थंडीचा अंदाज रविवारी दिला होता.मात्र,सोमवारी दुपारी देशाच्या वातावरणात अचानक मोठा बदल झाला.बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची स्थिती तयार झाल्याने दक्षिण व पूर्व भारतात पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्राकडे हे वारे वेगाने येत आहे.तर हिमालयात थंडी बळकट करणारा पश्चिमी चक्रवात सक्रिय झाल्याने डिसेंबरमध्ये हिमयुग अवतरल्यासारखे वातावरण राहणार आहे.उत्तरेतून थंडी अन् दक्षिणेकडून बाष्पयुक्त वारे राज्याकडे येत आहे.त्याची सुरुवात २९ नोव्हेंबरपासून होईल मात्र, थंडीची तीव्रता १ डिसेंबरपासून वाढणार असल्याचा अंदाज आहे.
पश्चिम हिमालयीन प्रदेशावर २९ नोव्हेंबर रोजी पश्चिमी चक्रवात तयार होत आहे.त्यामुळे उत्तर भारताकडून थंडी तर दक्षिणेकडून पावसाचा प्रभाव असल्याने हवेत जास्त बाष्प अन् थंडी असे मिश्र वातावरण राहण्याची शक्यता आहे.तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये काही ठिकाणी गडगडाटी वादळ आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
- Advertisement -