उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- गडचिरोली जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यात अनोखा व आगळा वेगळा प्रकार एका ग्रामपंचायतीत उघडकीस आला आहे.चक्क उपसरपंचाने सरपंचाची उचलबांगडी केल्याने ग्रामपंचायतीच्या महिला सरपंचाला सरपंचपद व सदस्यत्वही गमवावे लागले आहे.
चामोर्शी तालुक्यातील चाकलपेठ ग्रामपंचायतीच्या महिला सरपंचा गीता विकास रायसिडाम यांनी पदाचा दुरुपयोग केल्याप्रकरणी गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा ४ एप्रिल २०२४ चा चौकशी अहवाल आदेश कायम ठेवत नागपूर विभागाचे अप्पर आयुक्त यांनी सरपंचपद व सदस्यत्व रद्द केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
सविस्तर वृत्त असे की,चाकलपेठ ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुनील जगन्नाथ रामगोनवार यांनी महिला सरपंचा गीता रायसिडाम ह्या ई-निविदा स्वतः पोर्टलवर अपलोड करूनही ई-निविदा न उघडणे,सन २०२०-२०२१ मध्ये सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाच्या कामाची स्वतःच्या चुलत सासऱ्याकडून तक्रार करवून पैसे व कमिशनची मागणी करणे व कंत्राटदाराची देयक अदा न करणे. देयक नस्तीवर स्वाक्षरी न करणे,पतीला व चुलत सासऱ्याला ग्रामपंचायतमध्ये बोलावणे,मासिक सभेतून फोन लावणे व त्यानंतर निर्णय घेणे आदी विविध प्रकारचे आरोप केले होते.यावर गैरअर्जदार सरपंच यांनी सदर आरोपाचे खंडन करत प्राथमिक आक्षेप अर्ज दाखल केला होता.अर्जदार उपसरपंच सुनील रामगोनवार यांनी केलेले आरोप ग्राह्य धरत जिल्हा परिषद मुख्याधिकारी यांचा ४ एप्रिल २०२४ चा चौकशी अहवाल मान्य करून गैरअर्जदार सरपंच गीता विकास रायसिडाम यांचे सदस्यत्व व सरपंचपद रद्द केले आहे.

