उद्रेक न्युज वृत्त
संपादक/सत्यवान रामटेके
गडचिरोली :- ग्रामीण भागातील गोर गरीब तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या घरकुल बांधकामाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नेहमी तत्पर असणाऱ्या कंत्राटी अभियंत्यांचे गेली ८ महिन्यांपासून मानधन रखडले असल्याने घरकुल बांधकामास आधार देणारेच निराधार झाले आहेत.अशातच ‘करीत रहा काम; तुम्हाला मिळणार नाही दाम’ असे हल्ली ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांच्या बाबतीत दिसून येत असल्याने घरकुल योजनेतील महत्वाचा दुवा असणाऱ्या अभियंत्यांवर उपासमारीची पाळी आली आहे.
ग्रामीण गृहनिर्माण कंत्राटी अभियंते(इंजिनिअर) घरकुल योजनेतील महत्वाचा दुवा समजला जातो आहे.घरकुल लाभार्थ्यांना घरकुल मंजूर होण्यापासून तर बांधकाम पूर्ण होण्यास्तवची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.जसे,कितीतरी किलोमीटर अंतरावरील घरकुल लाभार्थ्यांच्या घरोघरी जाऊन भेटी देणे,बांधकामाची आखणी करून देणे, टप्पे निहाय घरकुल बांधकामाचे फोटो काढून नेणे, लाभार्थ्यांना हफ्ते वितरीत करणे,वेळोवेळी बांधकामा संबंधी तांत्रिक अडचणींचे निराकरण करणे व इतर अशी अनेक कामे अभियंते करीत असतात.मात्र गेली ८ महिन्यांपासून ग्रामीण गृहनिर्माण कंत्राटी अभियंत्यांचे मानधन मिळाले नसल्याने घरकुल लाभार्थ्यांच्या घरा पर्यंत जाण्यास अडचणींचा सामना करावा लागत आहे.अशातच वेळेवर मानधन मिळत नसल्याने अभियंत्यांवर उपासमारीची पाळी बरोबरच उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.’नियमित कर्मचारी तुपाशी अन् कंत्राटी कर्मचारी उपाशी’अशी अवस्था हल्ली ग्रामीण गृहनिर्माण कंत्राटी अभियंत्यांची झाली आहे.
मिळणारे मानधन अत्यल्प असूनही वेळेवर मानधन मिळत नसल्याने कुटुंब सांभाळावे कसे?कामे करायची कशी?असा विचार अभियंत्यांच्या मनात घर करून सोडत आहे.कित्येकदा संप पुकारून आंदोलने करण्यात आली.मात्र शासनास केव्हा जाग येणार? हे अनेकांना कळेनासे झाले आहे.एकीकडे कामे करवून घेणे व कंत्राटी कर्मचारी वर्गांचे शोषण करणे असे दिसून येत आहे.नियमित कर्मचारी वर्गांचे वेळेवर वेतन न मिळाल्यास त्यांना कसे वाटणार? यासाठी शासनाने मानधनात वाढ करून गेली ८ महिन्यांचे मानधन तात्काळ देण्यात यावे; तसेच वेळेवर मानधन देण्यात यावे; अशी मागणी ग्रामीण गृहनिर्माण कंत्राटी अभियंत्यांकडून केली जात आहे.