उद्रेक न्युज वृत्त
संपादक/सत्यवान रामटेके
गडचिरोली :- जिल्ह्यात दररोज अवकाळी पावसाने थैमान घालत संततधार पडणारा पाऊस, वादळ-वारा,मेघ गर्जना व विजांचे कडकडाटाने संपूर्ण जनजीवन विस्कळित झाले आहे.आज ३० एप्रिल २०२३ रोजी रात्रौ पासूनच अवकाळी पाऊस व वादळ वाऱ्याने अनेक नागरिकांची घरे व झोपड्या वरील छत उडाले असल्याने नागरिकांनी नुकसाभरपाईची मागणी केली आहे.अशातच सर्वसामान्य नागरिक सध्या सुरू असलेला उन्हाळा की पावसाळा अशा संभ्रमात पडले आहेत.
हल्ली काही शेतकरी बांधवांचे धान पीक निसावण्याच्या तयारीत असतांना अवकाळी पडणारे पावसाचे पाणी त्यासाठी घातक ठरू लागले आहे. सोसाट्याच्या वादळ-वाऱ्याने उभे असलेले धान पीक खाली झोपू लागले आहेत.अशातच धो-धो पडणारा पाऊस व वादळ वारा आणखी किती दिवस येणार?असा प्रश्न निर्माण झाला आहे.यामुळे शेतकरी बांधव चिंताग्रस्त झाले आहेत.शहरी तसेच ग्रामीण भागात सध्या स्थितीत लग्न समारंभ सुरू असून ‘घरी लग्न तर अवकाळी पावसाने घातलाय विघ्न’अशी हल्ली परिस्थिती उद्भवली असल्याने विवाह सोहळ्यात अवकाळी पावसामुळे विरजण पडले आहे.धो-धो पडणाऱ्या पावसामुळे ग्रामीण भागातील रस्त्यावरून पाणी तसेच नाल्या भरभरून वाहू लागल्या आहेत. लग्न समारंभातील वऱ्हाडी मंडळी पावसामुळे एखाद्या घराचा वा सार्वजनिक ठिकाणचा आडोसा घेतांना दिसून येत आहेत.सकाळचे विवाह दुपारी वा सायंकाळी लागतांना दिसून येत आहेत.
हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार २७ एप्रिल ते ३० एप्रिल २०२३ पर्यंत अवकाळी पाऊस,वादळ वारा व कडकडाटासह मेघ गर्जना होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता.त्यानुसार अवकाळी पावसाने थैमान घालत जनजीवन विस्कळित केले आहे.अशातच आणखी किती दिवस अवकाळी पाऊस पडणार आहे; अशी स्थिती हल्ली निर्माण झाली आहे.