- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्यातून जाणाऱ्या गोंदिया ते बल्लारशा या २४० किलोमीटर रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी केंद्र सरकारने तब्बल ४ हजार ८१९ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे विदर्भातील रेल्वे वाहतुकीला गती मिळणार असून गडचिरोली व विदर्भाचा मध्य प्रदेश,छत्तीसगड, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यांतील बाजारपेठेशी संपर्क अधिक मजबूत होणार आहे.सदरची रेल्वे लाईन गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेतून जाणार असल्याने येथील उद्योग, व्यापार,पर्यटन आणि स्थानिक रोजगाराच्या संधींना मोठा चालना मिळणार आहे.जिल्ह्यातील नैसर्गिक संपत्ती,जंगलउपज,खनिज संपत्ती आणि कृषी उत्पादन यांना बाजारपेठांपर्यंत पोहोचवण्यासाठी रेल्वेचा हा प्रकल्प अत्यंत उपयुक्त ठरणार असून खनिज संपत्तीवर आधारित उद्योगांना मालवाहतूक सुलभ होणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज,शुक्रवार ११ एप्रिलला दूरदृष्य प्रणालीद्वारे माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधत प्रकल्पाची माहिती दिली.गडचिरोली येथून माध्यम प्रतिनिधींसोबत जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा,जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की,केंद्र सरकारने महाराष्ट्रातील १३२ रेल्वे स्थानकांच्या विकासावर भर दिला असून,यामुळे राज्यातील संपूर्ण रेल्वे नेटवर्क सशक्त होणार आहे.याचबरोबर,केंद्र सरकारच्या पुढाकाराने राज्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज सर्किट’ नावाने एक आयकॉनिक रेल्वे टूर लवकरच सुरू होणार असून,यात महाराजांच्या इतिहासाशी संबंधित विविध किल्ले व सांस्कृतिक स्थळांना जोडणारी विशेष पर्यटन रेल्वे चालवण्यात येणार आहे. यामुळे महाराष्ट्राच्या पर्यटन विकासालाही चालना मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
- Advertisement -