उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- जिल्ह्यातील कृषी पंप धारक शेतकरी बांधवांना केवळ ८ तास विद्युत पुरवठा केला जात असल्याने विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी आवाज उठवून रस्ता रोको आंदोलन,चक्का जाम आंदोलन, कार्यालयातील अधिकारी,कर्मचारी यांना घेराव घालून आंदोलन व इतर आंदोलने करून विद्युत पुरवठा करणाऱ्या वीज वितरण कंपनीला वेठीस धरून किमान १२ तास शेतकरी बांधवांच्या कृषी पंपांना वीज पुरवठा करण्यात यावा; अशी मागणी यापूर्वीही व हल्ली करण्यात येत आहे.
विविध संघटनांनी केलेल्या मागणीनुसार, महावितरणने ३ मार्च २०२३ रोजी उद्योग,ऊर्जा व कामगार विभागास पत्रव्यवहार करून २४ तास वीज पुरवठ्याची मागणी केली होती.त्यानुसार उद्योग,ऊर्जा व कामगार विभागाने काल १५ मार्च २०२३ रोजी उप सचिव यांच्या सहिनिशी अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक,महावितरण कंपनी मर्या.प्रकाशगड,वांद्रे (पूर्व),मुंबई -५१ यांना निर्देश देऊन आरमोरी,जिल्हा गडचिरोली मतदार संघासह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यामधील कृषीपंपाना दिवसा १२ तास वीजपुरवठा देण्याबाबत पत्राद्वारे कळविले आहे.
उद्योग,ऊर्जा व कामगार विभागाने दिलेल्या निर्देशामध्ये म्हटले आहे की,गडचिरोली जिल्ह्यामध्ये कृषीपंपांना ही कार्यवाही सुरू केल्यापासून पुढील दोन महिने दिवसा १२ तास ३ फेज वीज पुरवठा देण्याबाबत संबंधीत क्षेत्रीय अधिकाऱ्यांना तात्काळ सूचना देवून त्याची अंमलबजावणी सुरु करावी व या संबंधी केलेल्या कार्यवाहीची माहिती शासनास सादर करावी.