उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने करण्यात येणारी धान खरेदी व मिलिंग यामध्ये गैरव्यवहार केल्याप्रकरणी आदिवासी विकास महामंडळ,गडचिरोलीचे प्रादेशिक व्यवस्थापक गजानन रमेश कोटलावार यांना ८ ऑगस्ट रोजी निलंबित करण्यात आले आहे.या संदर्भाचे आदेश आदिवासी विकास महामंडळ, नाशिकच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बनसोड यांनी काढले..यामुळे महामंडळातील घोटाळेबाज अधिका-यांचे धाबे दणाणले आहेत.
प्रादेशिक व्यवस्थापक गजानन कोटलावार यांच्याबाबत महामंडळाकडे अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.या तक्रारींची चौकशी करण्यासाठी समिती नेमली होती.या समितीने कोटलावार यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा ठपका ठेवला.त्यात राईस मिलमध्ये विद्युत जोडणी झाली नसतानाही भरडाईचा करारनामा करण्यात आला.धानाची मिलिंग करणा-या मिलर्सला बँक गॅरंटीपेक्षा जादा डीओ देणे,राष्ट्रीयीकृत बँकेची गॅरंटी न घेता सहकारी बँकेची गॅरंटी घेऊन धान भरडाईस परवानगी देणे,धान भरडाईच्या तुलनेत विजेचा वापर न होणे; अशा अनेक गैरप्रकारात कोटलावार यांची भूमिका संशयास्पद आढळून आल्याने त्यांना निलंबित करण्यात आले.विशेष म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून आदिवासी विकास महामंडळात अशाप्रकारचे गैरप्रकार समोर आले आहे.मात्र संबंधित करारपात्र मिल मालकावर कधीच कारवाई होतांना दिसून येत नाही.