उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-मनात जिद्द आणि चिकाटी असेल तर कुठलेही ध्येय गाठता येते.हे सर्वकाही शक्य करून दाखवले गडचिरोली जिल्ह्यातील एका विवाहित स्त्रीने.नुकतेच १ ऑगस्ट रोजी जाहीर झालेल्या एमपीएससीच्या पोलीस उपनिरीक्षक(पीएसआय) निकालात तिने घवघवीत यश मिळविले आहे.दुशीला भीमराव शेंडे मु.खरमतटोला,पोस्ट-देऊळगाव,ता. कुरखेडा,जि.गडचिरोली येथील रहिवासी असून २०१० मध्ये त्यांचे लग्न झाले.पती चंद्रपूर थर्मल पावर स्टेशनमध्ये नोकरीला आहेत.
लग्न झाल्यावर घर संसार सांभाळत दुशीलाने जिद्द आणि चिकाटीने अभ्यास करून एमपीएससीचा गड सर केला आहे.तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरावरून कौतुक केले जात आहे.दुशीलाचे प्राथमिक शिक्षण खरमतटोला येथे झाले. त्यानंतर इयत्ता ८ ते १० वीपर्यंतचे शिक्षण देऊळगाव येथील विद्या विकास हायस्कूलमध्ये झाले.आरमोरी येथील महात्मा गांधी महाविद्यालयातून पदवी घेतली व पदव्यूत्तर पदवी ब्रह्मपुरी येथील एन.एच. महाविद्यालयात घेतली.दुशीला घरची सर्वात मोठी मुलगी असून एक भाऊ सीआरपीएफ मध्ये कोब्रा कमांडर तर दुसरा भाऊ सिव्हिल इंजिनियर आणि लहान बहीण समाजकार्यातून पदव्यूत्तर पदवी घेतली आहे.वडील ग्रामीण भागातील शेतकरी असून देखील सर्वच मुलांना उच्च शिक्षण दिले.२०१० मध्ये दुशीलाचे लग्न वीरेंद्र मेश्राम यांच्याशी झाले.त्यांच्याकडूनच स्पर्धा परीक्षेबाबत माहिती मिळाली अन् त्यानंतर तिने अभ्यासात सातत्य ठेवून स्पर्धा परीक्षेची तयारी केली.पती चंद्रपूर थर्मल पावर स्टेशनमध्ये नोकरीला असून त्यांनी दुशीलाला साथ दिल्याने अखेर तिला यश मिळाले आहे.विशेष म्हणजे लग्नानंतर अनेकांना वाटते की,आपले करिअर संपते.लग्नानंतर महिलांची स्वप्न अपूर्ण राहतात.मात्र,गडचिरोली जिल्ह्यातील दुशीलाने लग्नानंतर देखील अत्यंत अभिमानास्पद कामगिरी केली आहे.
दुशीलाने कोणत्याही प्रकारची शिवकणी वर्ग न लावता त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी केली.’सेल्फ स्टडी’वर भर देत जुन्या सर्व प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केला.चंद्रपूर येथील लायब्ररीमध्ये सकाळी ९ ते २ सायंकाळी ४ ते ८ असा अभ्यास करीत,तिने पूर्णवेळ तयारी केली,यातूनच त्यांना यशाला गवसणी घालता आली असल्याचे त्यांनी सांगितले.