उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- बाजारपेठांमध्ये हल्ली उष्णतेपासून बचाव करण्याकरिता टवटवीत व आकाराने मोठी दिसणारी फळे खरोखरच आरोग्यास लाभदायक की हानिकारक असा प्रश्न पडला आहे.टवटवीत,आकाराने मोठी व रंग गडद असणाऱ्या फळांच्या बाबतीत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
उन्हाळ्यात मानवी शरीरासाठी टरबूज व खरबूज पोषक असतात.टरबूज व खरबूज लहानांपासून तर वृद्धापर्यंत मोठ्या आवडीने खातात.उन्हाळ्याच्या दिवसात ही फळे उष्णतेपासून बचाव करण्याकरिता फार मदत करतात.फळे आरोग्यास हितकारक असली तरी फळांचा आकार वाढविण्यासाठी तसेच रंग गडत दिसण्याकरिता ‘ऑक्टोसीन’ नावाच्या घातक रसायनाचे इंजेक्शन फळांना दिल्या जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.आरोग्यवर्धक म्हणून प्रत्येक फळांना महत्त्व आहे. यामध्ये टरबूज,खरबूज, काकडी,सफरचंद,पपई, फणस,आंबा,डाळींब,केळी सारख्या आरोग्यवर्धक फळांना जास्तीत जास्त मोठा आकार येण्यासाठी काही खासगी सिड कंपन्या शेतकऱ्यांना बीजे पुरवून या फळांच्या देठामध्ये घातक रसायन असलेले 3 ते 4 मिली सोडण्यासाठी सांगतात.फळांच्या देठामध्ये रसायन टाकल्याने फळांचा आकार लवकरात लवकर मोठा होऊन अशांची विक्री बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर केली जात आहे.
फळांचा रंग गडद व आकार मोठा दिसत असल्याने भुरळ घातली जात आहे.मात्र अशी ही फळे खरोखरच पोषक व आरोग्यवर्धक असतात कां? असा प्रश्न निर्माण झाला आहे.फळांच्या देठामध्ये प्रामुख्याने ‘ऑक्टोसीन’ नावाचे घटक असलेल्या इंजेक्शनचा वापर करण्यात येतो.शासनाने अशा प्रकारच्या रसायनावर बंदी घातलेली असल्याने असे इंजेक्शन आंध्रप्रदेश,कर्नाटक राज्यातून मोठ्या प्रमाणात येत असून परिसरात त्याची विक्री सर्रास होताना दिसत आहे.इंजेक्शनचा उपयोग प्रामुख्याने वामरू मरण पावलेल्या दुधाळ जनावरांचे दूध काढतेवेळी करण्यात येतो.रसायनाचा वापर त्वरित बंद करून यावर आळा घातला पाहिजे.अन्यथा पैश्याच्या हव्यासापोटी नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळणे सुरूच राहणार आहे.