उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- सहा लाखांचे बक्षिस असलेल्या महिलेस गडचिरोली पोलिसांनी अटक केली असून सदर महिला विविध हिंसक कारवायांमध्ये सहभागी असल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. राजेश्वरी उर्फ कमला पाडगा गोटा,असे अटक करण्यात आलेल्या नक्षलीचे नाव असून,ती छत्तीसगड राज्यातील बिजापूर जिल्ह्यातील बडा काकलेर येथील रहिवासी आहे.
राजेश्वरी गोटा ही २००६ मध्ये नक्षल्यांच्या चेतना नाट्य मंचमध्ये पहिल्यांदा सहभागी झाली. त्यानंतर ती उपकमांडर झाली. पुढे छत्तीसगडमधील फरसेगड दलममध्ये ती कार्यरत राहिली. २०१९ मध्ये तिला अटक करण्यात आली होती. २०२० मध्ये सुटका झाल्यानंतर ती दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीत एरिया कमिटी मेंबर म्हणून कार्यरत होती. छत्तीसगड राज्यातील विविध ठिकाणी तसेच गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील केडमारा येथे २०२३ मध्ये झालेल्या चकमकीत तिचा प्रत्यक्ष सहभाग होता. महाराष्ट्र शासनाने तिच्यावर ६ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

