उद्रेक न्युज वृत्त
मुख्य संपादक/सत्यवान रामटेके
गडचिरोली:-गडचिरोली जिल्हा हा मुख्यत्वे महाराष्ट्र राज्यात आदिवासी,बहुल,नक्षलग्रस्त,मागासलेला व घनदाट जंगलाने व्याप्त जिल्हा म्हणून ओळखला जातो.हा जिल्हा अतिदुर्गम,डोंगर दऱ्याने व्याप्त व अविकसित असून जास्तीत जास्त क्षेत्र जंगलाने वेढलेला आहे.अशातच गडचिरोली जिल्ह्याच्या वन विभागा विरोधात भ्रष्टाचार,अवैध उत्खनन,अवैध वृक्ष तोड,निकृष्ट दर्जाची बांधकामे,गैरव्यवहार,साहित्य खरेदी घोळ व इतर अशा अनेक बाबतीत सर्वात जास्त आंदोलने तसेच आमरण उपोषण करण्यात येत असल्याने गडचिरोली जिल्ह्यातील वन विभागात चालले तरी काय? असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
मागील काही आठड्यांपूर्वी अवैध मुरूम उत्खनन प्रकरणी जिल्ह्यातील वन कर्मचारी निलंबित झाले होते.तत्पूर्वी मागील वर्षात सामाजिक वनीकरण विभाग देसाईगंज विरोधात तीनदा आमरण उपोषणाचा पावित्रा घेण्यात आला होता.जिल्ह्यामध्ये साहित्य घोळ बाबतीत सेटिंग झाल्याच्या चर्चांना काही काळ उधाण आले होते.मनमानी कारभारामुळे निलंबनाचे प्रकरण होऊन गेलेत; अशा अनेक झोलबा पाटलाच्या वाड्या सारख्या घटना वारंवार घडू लागल्या आहेत.अशातच आता जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यांतर्गत येत असलेल्या मेंढरी-गर्दैवाडा या रस्ता कामात मोठ्या प्रमाणात वनपरिक्षेत्रातून अवैधरित्या गिट्टी व मुरुमाचे उत्खनन करून वापर करण्यात आला आहे.सदर प्रकार संबंधित वनअधिकारी,कर्मचाऱ्यांसह कंत्राटदाराच्या संगमनाताने झाल्याचा आरोप करीत संबंधितांवर कारवाई करण्यात यावी; या मागणीला घेऊन सामाजिक कार्यकर्ते श्रीकृष्णा वाघाडे यांनी गुरुवारी बेमुदत ठिय्या आंदोलन पुकारले आहे.तसेच रेक्कलमट्टा ते रेंगाटोला या रस्ता बांधकामातही गट्टा व एटापल्ली वनपरिक्षेत्रातून अवैधरित्या मुरूम उत्खनन केला गेल्याचा आरोप श्रीकृष्णा वाघाडे यांनी केला आहे.यासंदर्भात वनविभागाच्या वरिष्ठांकडे तक्रार करुनही कोणतीही कारवाई न झाल्याने वाघाडे यांनी गुरुवारपासून मुख्य वनसंरक्षक कार्यायासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन पुकारले आहे.एकदा-दोनदा तक्रार देऊनही संबंधित प्रकरणाची चौकशी करून कारवाई कां करण्यात येत नाही? प्रकरण गंभीर स्वरूपाचा दिसू लागल्यासच काही जणांच्या डोळ्यांच्या पापण्या उघडू लागतात.याला काय म्हणावे? अशांवर आळा घालणार कोण? त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील वन विभागात चालले तरी काय?असा सवाल अनेकांकडून उपस्थित केला जातो आहे.

