- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली/नागपूर :-भारतीय हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक केंद्राने गडचिरोली जिल्ह्यासाठी उद्या,बुधवार २९ जुलै रोजी रेड अलर्ट तर ३० जुलै रोजी ऑरेंज अलर्ट जारी केला असून जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.वैनगंगा,गोदावरी,प्राणहिता,बांडिया,इंद्रावती आदी नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होण्याची तसेच नाल्यांना पूर येण्याची शक्यता लक्षात घेता विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अविश्यांत पंडा यांनी उद्या बुधवार,२९ जुलै २०२६ रोजी संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर केली आहे.या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, शासकीय व खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा,नगरपालिका शाळा,अनुदानित व विनाअनुदानित शाळा,आश्रमशाळा,सर्व महाविद्यालये तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्था व इतर व्यावसायिक प्रशिक्षण संस्थांनाही सदरची सुट्टी लागू राहणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करण्याचे,अनावश्यक प्रवास टाळण्याचे तसेच नदी-नाल्यांच्या परिसरात जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे.आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ तसेच लागू असलेल्या कायद्यांनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
गडचिरोलीसह,चंद्रपूर जिल्ह्यात उद्या बुधवारी मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांकडून जिल्ह्यातील सर्व शाळा,महाविद्यालय आणि खाजगी कोचिंग क्लासेसला सुट्टी जाहीर केली आहे.उद्याला हवामान खात्याने चंद्रपूर जिल्ह्याला मुसळधार पावसाचा म्हणजेच रेड अलर्टचा इशारा दिला आहे.मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी सुट्टीचे आदेश दिले आहे,सोबतच प्रशासनाकडून सर्व नागरिकांना मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता सावधगिरी बाळगण्याची सूचना केली आहे. आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी नागरिकांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय,चंद्रपूर येथे ०७१७२-२५००७७ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा,असेही आवाहन करण्यात आले आहे.
आज मंगळवारच्या दुपारी नागपुरात मुसळधार पाऊस कोसळला.मुसळधार पावसाने अनेक सखल भागात पाणी शिरले होते,काही शाळेत पाणी शिरल्याने विद्यार्थी देखील अडकले होते.उद्याला सर्वत्र मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी उद्या बुधवारी नागपूर शहर आणि ग्रामीण भागातील हिंगणा,कामठी व शहरा लगतच्या भागातील शाळा,महाविद्यालय व अंगणवाडींना सुट्टी जाहीर केली आहे.
- Advertisement -

