उद्रेक न्युज वृत्त
मुख्य संपादक/ सत्यवान रामटेके
गडचिरोली :- गडचिरोली तालुक्यातील मौजा- साखरा येथे गडचिरोली ते नागपूर (३५३ C) महामार्ग लगत २० मिटर अंतरावर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेची इमारत असून त्या शाळेत इयत्ता १ ते ७ वर्गापर्यंतचे शिक्षण घेण्यासाठी गावातील चिमुकले बालके जातात.साखरा हे गाव (३५३ C) राज्य महामार्ग चे दोन्ही भागात विभागले असल्यामुळे छोटी बालके ही रस्ता ओलांडुन शाळेत जात असतात व महामार्ग असल्याने रस्त्यावरून ये-जा करणारी वाहने ही भरधाव वेगाने जात असल्याने रस्ता ओलांडत असतांना छोट्या बालकांचे अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही? सदर जि.प. उच्च प्राथमिक शाळेसमोर गतीरोधक तयार होण्याचे हेतूने गडचिरोली जिल्ह्यात सन २०१९ ला राष्ट्रीय बाल हक्क आयोग दिल्ली तथा जिल्हा प्रशासन गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने जनसुनवाही कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.जनसुनवाई मध्ये सदर प्रकरणास घेवून निवेदन देण्यात आले होते व राष्ट्रीय बाल हक्क आयोग दिल्ली यांनी (टोकन क्रमांक १४७ व केस क्रमांक MH-११२/५४/२०१८-१९/RTE Bench) देऊन संबंधीत विभागातील प्रमुखांना सदर प्रकरण निकाली काढण्याबाबतचे आदेश सुध्दा निर्गमीत केलेले होते.परंतु ४ वर्षाचा कालावधी लोटुन सुध्दा आजतागायत मौजा-साखरा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेसमोर गतीरोधक तयार झाले नाही.सदर प्रकरणाबाबत शिक्षण विभाग जि.प.गडचिरोली तथा जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय गडचिरोली येथे सदर प्रकरणाचे अनुषंगाने चौकशी केली असता; प्रकरण हे आमच्या विभागाशी संबंधीत नाही; असे उत्तर मिळत आहे.यावरून असे निदर्शनास येत आहे की,जिल्हा प्रशासन हे निव्वळ हे चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळत आहेत.व बालकांचे हक्क व अधिकारांचे हनन करीत आहेत. म्हणजेच गोरगरिबांच्या मुलांचा भेदभाव अजूनही कायम असल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे.याचे साधे उदाहरण द्यायचे झाले तर गडचिरोली शहरात गडचिरोली ते नागपूर (३५३ C) राज्य महामार्गावर एका नामवंत प्लॅटीनम जुबली शाळेसमोर येथे गर्भ श्रीमंताची बालके शिक्षण घेत आहेत.त्याठिकाणी जिल्हा प्रशासनाने गतीरोधक तयार केलेला आहे व कामगार,मजुर,शेतकरी वर्गांची मुले शिक्षण घेत असलेल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेसमोरील गडचिरोली ते नागपूर (३५३ C) राज्य महामार्गावर रीतसर मागणी करूनही गतीरोधक कां नाही? असा ज्वलंत प्रश्न निर्माण झाला आहे.त्यामुळे एखाद्या शहरात माणसे वा त्यांचीच मुले राहतात व ग्रामीण भागात जनावरे राहतात की काय?असा विचार मनात घर करुन सोडत आहे.याकडे दुर्लक्ष न करता साखरा जिल्हा परिषद शाळेसमोर गतीरोधक बांधकाम तात्काळ करण्यात यावा; अशी मागणी सामाजिक कार्यकर्ती अर्चना लहुजी चुधरी(बोरकुटे) यांनी केली आहे.

