उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- शासकीय कामात अडथळा निर्माण करुन महिला पोलिस उपनिरीक्षकास किरकोळ जखमी करणाऱ्या आरोपी मायलेकींना जिल्हा व सत्र न्यायालयाने काल, सोमवारी दिनांक-१ एप्रिल रोजी २ महिने कारावास व प्रत्येकी १ हजार रुपये दंडाची शिक्षा,दंड न भरल्यास १० दिवस वाढीव शिक्षा ठोठावली आहे.
रजनी रामचंद्र आत्राम वय ४७ वर्ष, शितल रामचंद्र आत्राम,वय २६ वर्ष दोन्ही रा.गांधीवॉर्ड देसाईगंज अशी शिक्षा ठोठावलेल्या महिला आरोपींची नावे आहेत.सविस्तर असे की,पोलिस स्टेशन देसाईगंज येथील फिर्यादी महिला पोलिस उपनरीक्षक सोनम नाईक या आपल्या हद्दीतील महिला पोलिस उपनिरीक्षक सुजाता भोपळे व पोस्टे स्टाफसह प्रोव्ही रेड कामी २७ ऑक्टोबर २०१२ रोजी देसाईगंज शहरात पेट्रोलिंग करीत होत्या.दरम्यान,गांधीवॉर्ड देसाईगंज येथील आरोपी रजनी आत्राम ही तिच्या राहत्या घरी अवैधरीत्या देशी,विदेशी दारूची विक्री करते,अशी गोपनिय माहिती मिळाल्याने पंचांना प्रोव्ही रेड बाबत माहिती देऊन,पंचांसमक्ष आरोपीच्या घराची झडती घेतली.यावेळी दुसरी महिला आरोपी शितल आत्राम हिने शिविगाळ करून एकाएकी फिर्यादीच्या अंगावार जावून दोन्ही हात पकडून शोकेस आलमारीकडे ढकलत नेले.मान खाली दाबून मानेवर बुक्यांनी मारले.सोबत असलेल्या मपोउपनि सुजाता भोपळे यांचेही दोन्ही हात पकडून खाली ढकलून दिले.तेव्हा पोलिस स्टाफ व पंचांनी समजाविण्याचा प्रयत्न केला.तरी सुद्धा आरोपींनी अश्लिल शब्दात शिविगाळ केली.फिर्यादींनी याबाबतची तक्रार पोलिस स्टेशन देसाईगंज येथे २७ ऑक्टोबर २०१२ रोजी दिली.तक्रारीवरुन आरोपींवर कलम ३५३,३३२,५०४ व ३४ भांदवी अन्वये गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपीस २८ ऑक्टोबर २१० रोजी अटक केली. तपास पूर्ण करुन आरोपी विरुद्ध सबळ पुरावा मिळून आल्याने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयाने फिर्यादी व ईतर साक्षीदारांचे बयाण तसेच सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून १ एप्रिल २०२४ रोजी आरोपी रजनी आत्राम,शितल आत्राम, रा.गांधीवॉर्ड देसाईगंज जि.गडचिरोली या दोघींना जिल्हा व सत्र न्यायाधीश,आशुतोष नि.करमरकर गडचिरोली यांनी आरोपीला कलम ३५३,३४ भांदवी मध्ये दोषी ठरवून २ महिने कारावास व प्रत्येकी १ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास १० दिवस वाढीव शिक्षेची तरतूद करण्यात आली.सरकारी पक्षातर्फे सहाय्यक जिल्हा सरकारी वकील सचिन कुंभारे यांनी कामकाज पाहिले.

