उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- जिल्ह्यात उन्हाळी हंगाम सुरू असून धान पिकासाठी चिखलनी केल्या नंतर धानपीक वाढीच्या अवस्थेमध्ये शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांची मागणी असते.कृषी केंद्रधारकांना पॉस मशिनद्वारे खत विकणे केंद्र शासनाने अनिवार्य केले आहे.परंतु यानंतरही जिल्ह्यातील काही कृषी केंद्र संचालक ऑफलाइन पद्धतीने अनुदानित खताची विक्री करतांना दिसून येतात.खरीप आणि रब्बी हंगामात शेतकऱ्यांची खते,बियाणांची मागणी लक्षात घेता काही कृषी केंद्र चालक अतिरिक्त दराने खताची विक्री करुन शेतकऱ्यांची लूट करीत असतात.मात्र शेतकरी बांधव संबंधित कृषी केंद्र चालकांची तक्रार करीत नसल्याने कारवाई केली जात नाही.कारवाई साठी शेतकरी बांधवांनी सामोरे येण्याची गरज आहे.अनुदानित खताची ऑफलाइन पद्धतीने खताची विक्री करणे, परवाना ग्राहकास सहज दिसेल अशा ठिकाणी न लावणे,भावसाठा फलक अद्ययावत न ठेवणे, परवान्यामध्ये उगम प्रमाणपत्र नसतांना निविष्ठा विक्री करणे,साठा व विक्री रजिस्टर न ठेवणे,फॉर्म एनमध्ये साठा नोंदवही न ठेवणे,बिलावर शेतकऱ्यांची स्वाक्षरी न घेणे तसेच बॅच नंबर,उत्पादनाची तारीख न लिहिणे आदी न आढळल्याने कृषी केंद्रांवर कारवाई करण्यात येते.