उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- २ फेब्रुवारी २०१८ रोजी कुरखेडा पोस्टेचे पोलीस उपनिरीक्षक कृष्णा सहारे नेहमीप्रमाणे आपल्या कर्तव्यावर जात असताना त्यांना माहिती मिळाली की, डिप्राटोला ते तळेगाव कडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्याच्या बाजुला एका युवतीचा मृतदेह आढळून आला.त्यांनी तेथे जावून चौकशी केली असता,सदर युवती ही अंदाजे १८ ते २० वर्षांची असून तिचा गळा हत्याराने अर्धवट चिरलेला होता.सदर हत्येबाबत कुरखेडा पोस्टे स्टेशन येथे गुन्हा नोंद करून तपास सुरू केला.सदर युवतीजवळ ट्रॅव्हल्सचे तिकीट मिळाले.त्या तिकीटावर मोबाइल क्रमांक टाकण्यात आला होता.त्या मोबाइलचा एसडीआर काढला असता, तो मोबाइल आरोपीच्या मित्राचा होता.आरोपीच्या मित्राला विचारपूस केली असता, तो क्रमांक माझाच असून तो मी माझा मित्र आरोपी प्रदीप बालसिंग हारामी रा.ढोलडोंगरी ह.मु. अंतरगाव ता. कोरची,याला दिल्याचे त्याने सांगितले. यावरून आरोपीला ताब्यात घेवून चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली.चौकशीत आरोपीने सांगितले की, मृतक ही आरोपीची प्रेयसी होती.ती पुणे येथे नोकरी करीत होती. ती आपल्या गावाजवळील कोटगूल येथील मंडईकरिता पुणे येथून येत असताना आरोपीने ३१ जानेवारी २०१८ रोजी
५.३० वाजता दरम्यान देसाईगंज येथून तिला सोबत घेतले.डिप्राटोला व तळेगाव या कच्च्या रस्त्याच्या बाजुला नेले.त्याठिकाणी आरोपीने मृतकासोबत शारिरीक संबंध केले.याठिकाणी तिने त्याच्याजवळ लग्नाचा हट्ट धरला.मात्र आरोपीचे यापूर्वीच कॉलेजमधील मैत्रिणीशी प्रेमसंबंध असल्याने व मृतक ही लग्नासाठी तगादा लावत असल्याने त्याने तिचा गळा दाबला. ती मृत झाली किंवा नाही, यासाठी त्याने पुन्हा तिच्या गळ्यावर ब्लेडने वार करून जिवानीशी ठार केले.याप्रकरणी आरोपीला ३ फेब्रुवारी २०१८ रोजी अटक करण्यात आली.आरोपीविरुद्ध कुरखेडा पोस्टे कलम ३०२, ३७६ (१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.पोलिसांनी तपास पूर्ण करून आरोपीविरुद्ध सबळ पुरावा मिळून आल्याने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.फिर्यादी व इतर साक्षीदाराचे बयाण तसेच सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरुन तसेच प्रकरणातील परिस्थितीजन्य पुरावे लक्षात घेवून अप्पर जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश यु. एम. मुधोळकर यांनी आरोपी प्रदीप हारामी यास कलम ३०२ भादविमध्ये जन्मठेप व १ लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकिल अनिल प्रधान यांनी काम पाहिले.