उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- शासकीय अभियंत्याला नागपूर येथे हनी ट्रॅपमध्ये अडकवून १० लाखाची खंडणी मागितल्याप्रकरणी तरुणी,पत्रकार, पोलिस शिपायासह चौघांच्या गडचिरोली पोलिसांनी नागपूर येथे मुसक्या आवळल्या.सद्यस्थितीत चारही आरोपींना ५ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत गडचिरोली पोलिसांच्या शिस्तबद्ध तपासाअंती खंडणीबहाद्दरांची मोठी टोळी सक्रिय असून त्यांनी आठ ते दहा जणांना अशाचप्रकारे जाळ्यात ओढल्याचे समोर येत आहे. याच प्रकारे खंडणी वसूल करणारे १५ पत्रकार व फोटोग्राफर जिल्हा पोलिसांच्या रडारवर आले आहेत.
जिल्ह्यातील शासकीय कार्यालयात कार्यरत अभियंत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून खंडणी मागितल्या प्रकरणी पत्रकार रविकांत कांबळे,पोलिस शिपाई सुशील गवई,रोहित अहिर व इशानी या चौघा जणांच्या टोळीला गडचिरोली गुन्हे शाखेच्या पथकाने २९ जानेवारी रोजी नागपुरातून ताब्यात घेतले होते. तर एक महिला आरोपी पसार होण्यात यशस्वी झाली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस अधीक्षक निलोत्पल यांच्या नेतृत्वात गडचिरोली पोलिस ठाण्याचे ठाणेदार अरुण फेगडे यांनी तपासाला गती दिली आहे.पैसे उकळण्याच्या डावात नागपूर येथील पत्रकारासह पोलिस कर्मचाऱ्याचा समावेश आहे.याच पद्धतीने या टोळीने किती जणांना जाळ्यात ओढले या दिशेने तपास केला असता या टोळीमध्ये अनेकांचा समावेश असल्याचे दृष्टीस आले आहे.या टोळीद्वारे आतापर्यंत ८ ते १० नागरिकांना जाळ्यात अडकवून खंडणी वसूल केल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.यामुळे नागपूर येथील पत्रकारांसह, फोट्रोग्राफर असे १५ जण पोलिसांच्या रडारवर आले असून लवकरच त्यांच्या मुसक्या आवळल्या जाऊ शकतात.

