उद्रेक न्युज वृत्त
संपादक/सत्यवान रामटेके
गडचिरोली :- तालुक्यातील ग्रामपंचायत साखरा येथील सरपंच यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून ग्रामपंचायतीतील उपसरपंचासह सदस्य मासिक सभेवर बहिष्कार टाकणार आहेत.यासंदर्भातील पत्र जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी व पंचायत समितीचे गट विकास अधिकाऱ्यांना आज २४ मे रोजी पत्र सादर करण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, ग्रामपंचायत साखरा येथील विद्यमान सरपंच पुण्यवान सोरते हे ग्रामपंचायत उपसरपंच व सदस्य यांना विश्वासात न घेता परस्पर ग्रामपंचायत कार्यालयात सभा घेणे,उपस्थितांना बाकी सदस्यांविरुद्ध भडकविणे,मासिक सभेचे नोटीस वेळेवर न काढणे,मासिक सभेत कोणत्याही प्रकारची सदस्यांसोबत चर्चा न करता परस्पर आपल्या मताने ग्रामसभेचे आयोजन करणे इत्यादी बाबी ग्रामपंचायतमध्ये होत आहेत.यासंदर्भात विद्यमान सरपंच यांना विचारणा केली असता ते उद्धटपणे उत्तरे देतात.या त्रासाला कंटाळून सर्व सदस्य २४ मे ला होणाऱ्या मासिक सभेवर व यापुढे ग्रामपंचायतमध्ये होणाऱ्या मासिक सभेवर बहिष्कार टाकत असल्याची माहिती जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी, गट विकास अधिकारी पंचायत समिती गडचिरोली तथा सचिव ग्रामपंचायत साखरा यांना पत्रातून दिली आहे. निवेदन देतांना ग्रापंचे पदाधिकारी अर्चना बोरकुटे, कांचन चौधरी,जयमाला मेश्राम,अश्विनी जनबंधू, दिनेश चौधरी उपस्थित होते.
