उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- भरड धान्य व बियाणे संवर्धन तसेच भरड धान्याचे महत्व व जनजागृती होण्याचे हेतूने महाराष्ट्र आर.आर.ए.नेटवर्क तथा ग्रामीण युवा प्रागतीक मंडळ भंडारा यांच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यातील स्थानिक संस्था रुदय संस्था,नवदृष्टी युवती मंडळ साखरा,स्पर्श संस्था,संदेश संस्था यांनी गडचिरोली येथील रुदय संस्था यांचे कार्यालयात कार्यशाळेचे आयोजन केले होते.
सदर कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून अविल बोरकर सचिव ग्रामीण युवा प्रागतिक मंडळ भंडारा, काशिनाथ देवगडे संस्थापक रुदय संस्था गडचिरोली, गुरूदास सेमस्कर संदेश संस्था गडचिरोली,अर्चना चुधरी ( बोरकुटे )सचिव नवदृष्टी युवती मंडळ साखरा, दिनेश बोरकुटे सामाजिक कार्यकर्ता गडचिरोली हे होते.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक रुदय संस्थेचे कार्यकारी संचालक काशिनाथ देवगडे यांनी केले यात कार्यशाळा आयोजित करण्यामागचा उद्देश याबाबत विस्तृत अशी माहिती दिली.अविल बोरकर यांनी उपस्थित शेतकऱ्यांना धान्य व बियाणे संवर्धनाचे महत्व,भरड धान्याची ओळख तथा प्रकार,लागवड पद्धती याविषयी विस्तृत अशी माहिती दिली तसेच आजच्या शेतीत मोठ्या प्रमाणात रासायनिक खते व औषधाचा वापर करण्यात येत असल्यामुळे शेती व आरोग्य या दोन्ही मधील संबंध दुरावत गेला आहे.तसेच मानवी शरीराला लागणाऱ्या उष्माकांची गरज आज पूर्ण होत नसल्याने कुपोषनासारखे प्रकार आज समाजात दिसून येत आहे.त्यामुळे भरड धान्य व बियाणे संवर्धन हे गुणवत्ता पूर्ण अन्नासाठी गरजेचे असल्याची मांडणी केली.तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने भरड धान्य व बियाणे संवर्धन करण्याचे आवाहन बोरकर यांनी सदर कार्यशाळेप्रसंगी केले.
कार्यक्रमाचे संचालन रुदय संस्थेचे प्रकल्प समन्वयक कवींद्र नागापुरे यांनी केले तर संचालन दिलखुश चलाख यांनी केले.सदर कार्यशाळेला जिल्ह्यातील विविध तालुक्यातील २५ शेतकरी उपस्थित होते. कार्यशाळा यशस्वीतेकरता आयोजक संस्थांच्या कार्यकर्त्यांनी मोलाचे सहकार्य केले.