उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- राज्य सरकारने रेशनचे धान्य घेणाऱ्या ग्राहकांना आता ई-केवायसी करणे बंधनकारक केले आहे.त्यातून बनावट मृत लाभार्थी कमी होऊन धान्याचे वितरण पारदर्शकपणे होईल; असा राज्य सरकारचा दावा आहे.
ई-केवायसी करताना कार्डधारकांच्या सर्व सदस्यांना दुकानदारांकडे जाऊन आधार क्रमांक जोडावा लागणार आहे.दुकानदारांना त्यांच्याकडील सर्व ग्राहकांचे ई-केवायसी युद्धपातळीवर करण्याचे आदेश पुरवठा विभागाकडून देण्यात आले आहेत.मात्र, धान्याचे वितरण करायचे की ई-केवायसी असा प्रश्न दुकानदारांकडून विचारला जात आहे.राज्य सरकारने रेशनवरील धान्याचे वितरण पारदर्शकपणे” होण्यासाठी सर्व ग्राहकांना ई-केवायसी बंधनकारक केले आहे.त्यामुळे एका कार्डावरील सर्व कुटुंबातील सदस्यांना रेशन दुकानदारांकडे जाऊन ई केवायसी करावे लागणार आहे.त्यासाठी अद्ययावत असलेले आधार आवश्यक असून दुकानदाराकडे गेल्यानंतर नवीन फोरजी ई-पॉस मशीनमध्ये आधार क्रमांक टाकून बोटांचे ठसे व डोळे स्कॅन करून ई केवायसी करता येणार आहे.मात्र,एखाद्या ग्राहकाचे दहा वर्षांपूर्वीचे आधार असल्यास ई केवायसी करण्यापूर्वी आधार अपडेट करावे लागणार आहे.त्यानंतरच रेशनचे ई-केवायसी करता येणार आहे.

