उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :- शिंदे-फडणवीस सरकारने यावर्षीपासून आता एक नवीन उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आजी-आजोबा हे या कुटुंब पद्धतीमध्ये आधारस्तंभ आहेत. त्यांचा गौरव करण्यासाठी म्हणून या वर्षांपासून 10 सप्टेंबर रोजी सर्व शाळांमध्ये आजी-आजोबा दिवस साजरा करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.त्याचबरोबर शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करण्याबाबतच्या निर्णयाची माहिती देताना त्यांनी सांगितले की,२२ डिसेंबर २०२२ रोजी घेतलेल्या निर्णयानुसार राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे.त्यानुसार प्राथमिक व उच्च प्राथमिक वर्गातील शिक्षण सेवकांना १६ हजार रूपये, माध्यमिक वर्गातील शिक्षण सेवकांना १८ हजार रूपये तर उच्च माध्यमिक,कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षण सेवकांना २० हजार रूपये सुधारित मानधन देण्यात येणार आहे.हे मानधन १ जानेवारी २०२३ पासून लागू करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या मानधनामध्येदेखील वाढ करण्यात आली असून पूर्णवेळ ग्रंथपालांना 14 हजार रूपये तर पूर्णवेळ प्रयोगशाळा सहायकांना 12 हजार रूपये, कनिष्ठ लिपिकास 10 हजार रूपये तर चतुर्थ श्रेणी कर्मचारी केवळ अनुकंपा तत्त्वावरील नियुक्ती यांना आठ हजार रूपये मानधन मिळणार आहे.शिक्षण सेवकांच्या मानधानाची माहिती देताना त्यांनी मराठी भाषा विभागाच्यावतीने मराठी भाषा भवन उभारले जाणार आहे. तर मराठी भाषेशी संबंधित सर्व कार्यालये या इमारतीत एकत्र असणार आहेत.
नवीन शैक्षणिक धोरणानुसार मातृभाषेतून शिक्षणाला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे सांगत इतर भाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला दहावी इयत्तेत अडचण निर्माण होऊ नये यासाठी पर्यावरण विषयाप्रमाणे मराठी भाषेसाठी श्रेणी देता येईल का याचा अभ्यासही करण्यात येत असल्याची माहिती दीपक केसरकर यांनी दिली आहे.