उद्रेक न्युज वृत्त
गुवाहाटी :- भारतात मुलींपेक्षा मुलांना जास्त महत्त्व मिळत असल्याचे दिसते. मुलींना परक्याचे धन मानले जाते; परंतु भारतातील मेघालय, आसाम व बांगला देशातील काही भागात राहणाऱ्या खासी समुदायात वेगळी परंपरा पाहायला मिळते. या समुदायामध्ये मुलांना नाही तर मुलींना अधिक महत्त्व दिले जाते. येथे मुली नाही तर मुले मुलीसोबत सासरी जातात. मुलगी झाल्यानंतर आनंदोत्सव साजरा केला जातो, पण मुलगा झाल्यानंतर काही खास आयोजन केले जात नाही. या समुदायात मातांना आणि मुलींना देवाचा दर्जा दिला जातो.
पूर्णपणे मुलींसाठी ही जमात समर्पित मानली जाते. मुलीच्या जन्मानंतर काही लोक दुःख व्यक्त करतात, त्यांनी या समुदायाकडून शिकण्यासारखे आहे. आजदेखील भारतात बहुतांशी समाजातील लोक मुलीचा जन्म म्हणजे ओझं मानतात, लोकांची मानसिकता बदलत आहे. मुलींच्या जन्माचे देखील स्वागत केले जात आहे. खासी जमातीमध्ये मुले मुलीसोबत सासरी राहायला जातात. म्हणजे मुली आयुष्यभर आई- वडिलांसमवेतच राहतात. मुले आपले घर सोडून घरजावई म्हणून जातात आणि याला अपमान समजला जात नाही. वडिलोपार्जित संपत्ती मुलाला नाही तर मुलींना मिळते.