- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा तालुक्याच्या अरततोंडी येथील एका शेतकरी महिलेवर बिबट्याने हल्ला चढवून जखमी केल्याची घटना आज,मंगळवार ३ नोव्हेंबर रोजी दुपारी साडे तीन ते चार वाजेच्या दरम्यान अरततोंडी ते खरमतटोला मार्गावरील अरततोंडी नियतक्षेत्राच्या शेतशिवारात घडली.हेमा भूषण मेश्राम वय ३७ वर्षे,रा.अरततोंडी,ता.कुरखेडा,जि.गडचिरोली असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या शेतकरी महिलेचे नाव आहे.
माहितीनुसार,हेमा मेश्राम ह्या आज सकाळच्या सुमारास आपल्या शेतावर गेल्या होत्या.शेतातील धूऱ्यावर गवत आणि कचरा मोठ्या प्रमाणावर वाढलेला असल्याने त्याची कापणी करीत असतांनाच दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानकपणे त्यांच्यावर समोरून हल्ला चढवला.हल्ला चढवताच हेमा मेश्राम यांनी समयसूचकता राखत जवळच असलेली लाकडी काठी उचलून बिबट्यावर उगारली आणि आरडाओरड केली. दरम्यान,ओरडण्याचा आवाज ऐकून परिसरातील शेतकरी बांधवांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.तोपर्यंत बिबट्या जंगलाच्या दिशेने पळून गेला.मात्र,बिबट्याने केलेल्या हल्ल्यात हेमा मेश्राम यांच्या उजव्या हाताला खोल जखम झाली.घटनेची माहिती मिळताच महिला वनरक्षक वट्टी यांनी घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थांच्या मदतीने जखमी महिलेस देऊळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उचार करून पुढील उपचारासाठी कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाने बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा,अशी मागणी परिसरातील शेतकरी बांधवांनी केली आहे.
- Advertisement -

