- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-यंदा कमी पर्जन्यमान आणि जलाशयातील अपुऱ्या पाणीसाठ्यामुळे उद्भवू शकणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण नागपूर जिल्ह्यात नवीन बोअरवेल खोदकामे तसेच विद्यमान बोअरवेल अधिक खोल करण्याच्या कामांवर पुढील आदेशापर्यंत बंदी घालण्यात आली आहे.जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष कुमार आशीर्वाद यांनी यासंदर्भात सुधारित आदेश जारी करत सदरची बंदी ही नागपूर जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण क्षेत्रासाठी लागू करण्यात आली आहे.
मदत व पुनर्वसन विभागाच्या दुष्काळ मूल्यांकन प्रक्रियेअंतर्गत पहिली कळ-१ लागू केलेल्या राज्यातील तालुक्यांमध्ये नागपूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा समावेश आहे.त्यामुळे भूजल स्त्रोतांचे संरक्षण करणे, सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांवरील अतिरिक्त ताण कमी करणे आणि आगामी काळातील पाणी टंचाईची तीव्रता रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून हा निर्णय घेतला आहे.तहसीलदार, पोलिस,स्थानिक स्वराज्य संस्था तसेच भूजल सवेक्षण व विकास यंत्रणेच्या समन्वयाने प्रतिबंधित खोदकामांची तपासणी केली जाईल. बंदीतून घरगुती पाणी वापरासाठी करण्यात येणारी बोअरवेल खोदकामे, जुन्या बोअरवेलचे फ्लशिंग करण्याची कामे, त्याचप्रमाणे पिण्याचे पाणी,पाणीटंचाई निवारणासाठी करण्यात येणाऱ्या बोअरवेल खोदकामांनाही सूट दिली आहे.शासकीय यंत्रणेच्या अधिकृत कार्यादेशानुसार कंत्राटदारांमार्फत करण्यात येणाऱ्या अशा कामांनाही हा अपवाद लागू असेल. सदरचा अपवाद वगळता सुरू असलेली अन्य सर्व बोअरवेल खोदकामे,विद्यमान बोअरवेल अधिक खोल करण्याची कामे तात्काळ बंद करण्याचे निर्देश आहे. खोदकाम बंद केल्यानंतर कोणतीही बोअरवेल उघडी किंवा असुरक्षित स्थितीत ठेवू नये,बोअरवेल कंत्राटदार, रिगमालक आणि यंत्रचालकांनी बंदीच्या कालावधीत प्रतिबंधित खोदकामे स्वीकारू नयेत किंवा सुरू करू नयेत. शासकीय पाणीटंचाई निवारणाचे काम करतांना संबंधित कार्यादेशाची प्रत कामाच्या ठिकाणी उपलब्ध ठेवावी,असे निर्देशही दिले आहेत.आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील कलम ५१ तसेच इतर लागू कायदेशीर तरतुदींनुसार विहित प्रक्रिया पाळून कारवाई करण्यात येणार आहे.
- Advertisement -

