- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-आगामी जनगणनेत इतर मागासवर्गीय (ओबीसी)समाजासाठी स्वतंत्र कॉलम उपलब्ध करून देण्यासह संगणकीय ड्रॉप-डाऊन मेन्यूच्या माध्यमातून जात नोंदणी करण्याची मागणी सकल ओबीसी समाज जिल्हा गडचिरोलीच्या वतीने करण्यात आली आहे.या मागणीसाठी उद्या,रविवार १ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महामोर्चा व आंदोलन करून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात येणार आहे.
देशातील ५० टक्क्यांहून अधिक लोकसंख्या असलेल्या ओबीसी समाजाची अचूक लोकसंख्या आणि सामाजिक-आर्थिक परिस्थिती जाणून घेण्यासाठी जातनिहाय जनगणना आवश्यक असल्याचे संघटनेने म्हटले आहे.मात्र,जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम न ठेवता ओपन-एंडेड स्वरूपात जात विचारण्याच्या पद्धतीवर संघटनेने तीव्र आक्षेप नोंदविला आहे.२०११ मधील सामाजिक,आर्थिक व जातनिहाय जनगणनेत (SECC)ओपन-एंडेड पद्धतीमुळे देशभरात ४६ लाख ७० हजारांहून अधिक जाती-पोटजातींची नोंद झाली होती. उच्चार,स्पेलिंग आणि स्थानिक नावांमधील फरकामुळे आकडेवारीत मोठ्या प्रमाणात त्रुटी निर्माण झाल्या. परिणामी,या माहितीचा मागासवर्गीयांच्या विकासासाठी अपेक्षित उपयोग झाला नसल्याचा दावा संघटनेने केला आहे.अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींच्या धर्तीवर ओबीसींसाठीही जनगणनेत स्वतंत्र कॉलम असावा. तसेच केंद्रीय व राज्यस्तरीय मागासवर्गीय याद्यांच्या आधारे संगणकीय ड्रॉप-डाऊन मेन्यू तयार करून जातनोंदणी करावी,अशी मागणी करण्यात आली आहे. १९३१ च्या जातनिहाय जनगणनेनंतर ओबीसी प्रवर्गात अनेक जातींचा समावेश झाल्याने या समाजाची निश्चित लोकसंख्या जाणून घेणे आवश्यक असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.
- शिक्षण,रोजगार आणि आरक्षण धोरणांवर परिणाम👇
ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम नसल्यास समाजाची खरी लोकसंख्या व सामाजिक-आर्थिक वास्तव समोर येणार नाही.याचा परिणाम शिक्षण,रोजगार, अर्थसंकल्पीय तरतुदी आणि आरक्षणाच्या धोरणांवर होऊ शकतो.त्यामुळे ‘जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसेल,तर ओबीसींचा सहभाग नसेल’अशी ठाम भूमिका सकल ओबीसी समाजाने मांडली आहे.
केंद्र सरकारने जनगणनेच्या प्रश्नावलीत तातडीने सुधारणा करून स्वतंत्र कॉलम व ड्रॉप-डाऊन यादी लागू करावी.मागणी मान्य न झाल्यास देशव्यापी तीव्र जनआंदोलन छेडण्यासह आगामी जनगणनेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.या आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीची जबाबदारी केंद्र सरकारची असेल,असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.या निवेदनाच्या प्रती केंद्रीय गृहमंत्री,जनगणना आयुक्त, केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्री तसेच राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांना माहितीसाठी पाठविण्यात येणार आहेत.
- Advertisement -

