- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहरात सद्या स्थितीत अतिक्रमण हटाव मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू आहे.आरमोरी मार्ग ते बस स्थानक परिसर तसेच शहराच्या ब्रम्हपुरी मार्गावरील अतिक्रमण नुकतेच हटविण्यात आले आहे.अशातच कारवाई करण्याबाबत कुणाचेही दुमत नसल्याचे शहरातील सुशिक्षित बेरोजगारांचे म्हणणे आहे.परंतु रस्त्याच्या बाजूला एखादी टपरी सुरू करून आपला व आपल्या परिवाराचे कसे-बसे उदरनिर्वाह करून संसाराचा गाडा बेरोजगार युवक हाकत आहेत.वास्तविक पाहता आज बेरोजगारी एवढी वाढलेली आहे की,शासन या सर्वांना शासकीय नोकरी देऊच शकत नाही.अशावेळी बेरोजगारीच्या अवस्थेत राहण्यापेक्षा एखादा छोटा-मोठा व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांच्या जवळ आर्थिक पाठबळ नाही, मोक्याची जागा नाही, अशावेळेस या बेरोजगार युवकांनी काय करावे? ऐन तारुण्यात कुणासमोर पैश्यासाठी हात पसरावे? ही मोठी गहन समस्या निर्माण झालेली आहे.अनेक बेरोजगार युवकांनी व्यवसाय सुरू करण्यासाठी देसाईगंज येथील विविध वित्तीय संस्थांकडून कर्ज घेतलेले आहेत.व्यवसायाच्या माध्यमातून आपण त्या कर्जाची परतफेड करू अशी अपेक्षा त्यांना होती.पण आता व्यवसायच बंद झाल्यावर कर्जाचे हफ्ते भरायचे कसे? ही समस्याही त्यांच्या समोर आवासून उभी राहिली आहे.रस्त्याच्या कडेला असलेल्या खाली जागेवर समाजातील अनेक विधवा व परितक्त्या महिलांनी छोटे-छोटे व्यवसाय उभारून आपल्या कुटुंबाला हातभार लावला आहे.तर अनेकांच्या मुली- मुले उच्च शिक्षण घेण्यासाठी बाहेर गावी आहेत. त्यांच्या शिक्षणाचा प्रश्नही आता या निमित्ताने उभा येऊन ठेपला आहे.रस्त्यावरील अतिक्रमण हटविले या बद्दल कुणाचेही दुमत नाही,परंतु अतिक्रमण हटवीण्यापूर्वी बेरोजगारांना व्यवसाय करण्याकरिता जागा उपलब्ध करून दिली असती तर अनेक युवकांचे स्वप्न भंग झाले नसते.अशी भावना अनेक बेरोजगार युवकांनी प्रकट केली आहे.वास्तविक पाहता देसाईगंज नगर परिषदेने देसाईगंज क्षेत्रात अनेक शॉपिंग गाळे बांधलेले आहेत.पण त्यातील अनेक गाळ्यांचा वापर हा केवळ व्यापारी वर्गांच्या वस्तू ठेवण्यासाठी गोदाम म्हणून वापर करण्यात येत आहे.एवढेच नाही तर एकाच व्यवसायीकाकडे चार ते पाच गाळे देण्यात आलेले आहेत.त्यामुळे देसाईगंज नगर परिषदेने याकडे लक्ष घालून त्यातील काही गाळे बेरोजगार युवकांना रोजगार करण्यासाठी उपलब्ध करून दिल्यास रस्त्याच्या बाजूला अतिक्रमणसारखी समस्या निर्माण होणारच नाही.या बाबतीत देसाईगंज येथील काही बेरोजगार युवकांनी शासनाकडे अनेकदा मागणी केली.त्याचा पाठपुरावाही केला,परंतु अनेक वर्षाच्या प्रतिक्षेनंतरही शासनाकडून त्यांना कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळालेला नाही.याकडे स्थानिक लोप्रतिनिधींनी लक्ष देणे आवश्यक आहे.अनेक तरुणांचे आई-वडील हे वृध्द असून त्यांना आपल्या घरच्या कर्त्या पुरुषांवर अवलंबून राहावे लागते.त्यातच रोजगारच नसेल तर त्यांच्या म्हातारपणातील रुग्णालयाचा येणारा खर्च कसा भागवायचा? ही सुद्धा एक मोठी समस्या आहे.
नैना नरेश वासनिक देसाईगंज,बेरोजगार झालेली महिला👇
आरमोरी-देसाईगंज (वडसा) रस्त्या लगत जुन्या पंचायत समिती समोर खाली जागेत महिला स्वयंरोजगार अंतर्गत भोजनालय हा छोटासा व्यवसाय सुरू केलेला आहे.या व्यवसायावरच मी माझ्या कुटुंबाचा ऊदरनिर्वाह करीत आहे.यात माझ्या वृध्द सासऱ्याच्या दवाखान्याचा खर्च,दोन लहान मुलांचे शिक्षण करीत आहे.परंतु देसाईगंज नगर परिषदेकडून मला अतिक्रमण हटविण्याबाबत नुकतीच नोटीस आलेली आहे.त्यामुळे आता पुढील आयुष्य कसे जगायचे? हा मोठा प्रश्न माझ्या समोर उभा राहिला आहे.मी एक बेरोजगार महिला असून या पूर्वी मी व्यवसाय करण्याकरिता शासनाकडे रिक्त जागेची अनेकदा मागणी केली व अनेकदा मागणीचा शासनाकडे पाठपुरावा सुद्धा केला.परंतु शासनाकडून त्यावर कोणतीही दखल घेण्यात आली नाही. अचानकपणे माझे दुकान हटवीण्याबाबत नोटीस देण्यात आली यामुळे मी व माझे कुटुंब उघड्यावर पडलेले आहे.याबाबत शासन आणि लोक्रतिनिधींनी लक्ष घालून मीच नव्हे तर देसाईगंज शहरातील अनेक बेरोजगार युवकांना योग्य न्याय द्यावा; अशी मी प्रशासनाकडे विनंती करीत आहे.
- Advertisement -