उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :- जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील तिडका ग्रामपंचायत येथे एक अनोखा व आगळावेळा प्रकार उघडकीस आला आहे.एकाच मृत व्यक्तीचे दोन वेगवेगळ्या तारखांना मृत्यू झाल्याचे प्रमाणापत्र ग्रामपंचायतीने दिल्याने नातेवाईकांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.दरम्यान,दिलेल्या प्रमाणपत्रामुळे एकाच व्यक्तीचा दोन वेगवेगळ्या तारखांना मृत्यू कसा होऊ शकतो? असा प्रश्न मृतकाच्या नातेवाइकांसमोर निर्माण झाला आहे.
ग्रामपंचायत तिडका येथील रहिवासी असलेले बलदेव कोटवार यांनी त्यांच्या आईच्या मृत्यूचे प्रमाणपत्र ग्रामपंचायत तिडका येथे मागितले असता मानकूबाई बळीराम कोटवार यांच्या नावाचे दोन वेगवेगळ्या तारखांचे दोन मृत्यू प्रमाणपत्र देण्यात आले.
त्यामुळे या कामात हयगय केल्याप्रकरणी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.मानकूबाई बळीराम कोटवार यांचा मृत्यू जून २०२२ ला झाला असून,त्यांच्या मृत्यूचे प्रमाणपत्र बलदेव कोटवार यांनी मागितले असता,ग्रामपंचायत कार्यालय,तिडका येथील मूळ नोंद अभिलेखानुसार मानकूबाई बळीराम कोटवार यांच्या मृत्यूचे दोन प्रमाणपत्र देण्यात आले.७-६-२०२२ व ७-१-२०२३ हे दोन प्रमाणपत्र त्यांचा मुलगा बलदेव कोटवार यांना प्राप्त झाले.त्यामुळे त्यानी खंडविकास अधिकाऱ्याकडे लेखी तक्रार करून ग्रामसेविका टेकाम यांच्यावर कारवाई करावी व मूळ मृत्यूचे प्रमाणपत्र कोणते? याची सहनिशा करावी,अशी मागणी केली आहे.