उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :- अर्जुनी-मोरगाव पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या इसापूर (इटखेडा) येथील मेघश्याम कुंडलिक भावे वय ४२ वर्षे यांचा त्यांच्या पत्नीनेच गळा आवळून हत्या केली असल्याची घटना मंगळवारी दि.११ जून रोजी रात्रीच्या सुमारास घडली.मृताची आंघोळ घालत असताना गळ्यावर गळा दाबल्याची खूण आढळून आल्याने दी.१२ जून ला हत्येचा उलगडा झाला.याप्रकरणी मृतकाची पत्नी आणि आरोपी पत्नीच्या बहिणीच्या मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतले.हत्येचे कारण अद्यापही कळू शकले नाही.
इसापूर येथील मेघश्याम भावे हा मंगळवारी रात्री जेवण करून कुटुंबासह झोपी गेला.मात्र सकाळी तो उठला नाही.त्याचे वडील सकाळी ७ वाजता दूध काढण्यासाठी त्याला उठविण्यासाठी गेले.मात्र आवाज देऊनही तो उठला नाही.त्यामुळे पुंडलिक भावे यांनी त्याच्या पायाला स्पर्श केला असता पाय थंडगार असल्याचे जाणवले.त्यानंतर त्यांनी परिसरातील नागरिकांना आवाज दिला.शेजारच्या व्यक्तींनी त्याला तपासून मृत्यू झाल्याचे सांगितले. त्याचा मृत्यू नैसर्गिक असावा; असे वाटल्याने मेघश्यामच्या अंत्यसंस्काराची तयारी करण्यात आली. दुपारी १ वाजताच्या सुमारास मृताची अंघोळ घालत असताना त्याच्या गळ्यावर कसलीतरी खूण दिसून आली.त्यामुळे त्याचा मृत्यू नसून हत्या केली असावी;
असा संशय नातलगांना आला.त्यामुळे अर्जुनी मोरगाव पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी मृतदेह तपासून उत्तरीय तपासणीकरीता अर्जुनी मोरगाव येथे पाठविला.तपासातही त्याचा मृत्यू नैसर्गिक नसून गळा आवळून खून झाल्याचे समोर आले.त्यामुळे अर्जुनी मोरगावचे ठाणेदार विजयानंद पाटील,बिट अंमलदार डोंगरवार यांनी मृतकाची पत्नी वैशाली भावे आणि तिच्या बहिणीच्या मुलीला संशयाच्या आधारे ताब्यात घेत विचारपूस केली. पत्नीने केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली.मात्र कोणत्या कारणामुळे पतीची हत्या केली; हे अद्यापही स्पष्ट झाले नाही.या प्रकरणात आणखी आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता असून हत्येचे कारणदेखील समोर येणार आहे.